fbpx
Home > गुन्हे > वसईतील अनधिकृत बांधकामाला आयुक्तांचंच अभय

वसईतील अनधिकृत बांधकामाला आयुक्तांचंच अभय

आयुक्त सतीश लोखंडे काम करतात डॉमनिक सामाजिक कार्यकर्त्या डॉमिनिका डाबरे आणि विवेक पंडित यांच्या आदेशाने

अनधिकृत बांधकामाबाबत जेथे प्रशासन दक्ष असल्याचा मुखवटा चढवत असताना वसईतील एका बांधकामाला खुद्द वसई विरार महानगरपालिकाचे (वविमपा) आयुक्तच स्थानिक राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन अनधिकृत बांधकामाला अभय देण्याचा प्रकार सध्या येथे चालू आहे.

स्वप्निल राजेश डिकुन्हा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसईतील दिवाणवाडी, पापडी येथे राहणारे स्वप्निल राजेश डिकुन्हा यांच्या जागेवर येथेच राहणारे बार्तोल डायगो फर्नाडीस हे स्थानिक राजकीय लोकांच्या मदतीने २० फेब्रुवारी २०१८ पासून बेकायदेशीर पद्धतीने इमारत उभारत आहेत.

याबाबत स्वप्निल डिकुन्हा यांनी या बांधकामाला जोरदार विरोध करत वविमपा मध्ये सदर बांधकामाबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीची कागदोपत्री दाखल घेत वविमपा ने बार्तोल फर्नाडीस यांना संबंधित बांधकामाबाबत ३ दिवसात कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. परंतु फर्नाडीस यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे सादर करण्यात आले नाही. सदर बांधकामावर काहीही कारवाई होत नाही हे पाहून स्वप्निल यांनी नगररचनाकार विभागाकडेही याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागविली असता त्यांच्याकडूनही सदर बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगण्यात आले व याबाबत वविमपाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. वविमपा यांनी वसई पोलीस ठाणे मध्ये फर्नाडीस यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली. आज सादर बांधकामावर चौथ्या स्लॅबचे काम चालू आहे परंतु आठ महिने होऊनही आजपावेतो फर्नाडीस यांच्यावर तसेच सदर अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

वसई विरार महानगरपालिका, वसई पोलीस आणि नगर रचनाकार विभाग यांच्याकडून फक्त पत्रव्यवहार होत असल्याचे दाखविण्यात येत आहे. परंतु कारवाई करण्याबाबत हे विभाग अजूनही कोसो दूर असल्याचे आढळून आले. या बांधकामाला स्थानिक राजकीय मंडळींचं अभय असून सामाजिक कार्यकर्त्या डॉमिनिका डाबरे आणि विवेक पंडित यांच्या दबावामुळे वविमपा चे आयुक्त सतीश लोखंडे कारवाई करत नसल्याचे स्वप्निल डिकुन्हा यांनी सांगितले. तसेच या कारवाईसाठी विवेक पंडित आणि डॉमिनिका डाबरे यांना विचारावे असे उत्तर आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडून स्वप्निल डिकुन्हा यांना देण्यात आले, तशा आशयाचा मेसेजही स्वप्निल डिकुन्हा यांना पाठविण्यात आला आहे.

कायदेशीर मार्गाने न्याय मिळत नसल्याने स्वप्निल डिकुन्हा यांनी उपोषणाचे हत्यार उचलले असून त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. परंतु अजूनही त्यांची प्रशासनाने दाखल घेतलेली नाही.

जेथे सर्वसामान्य जनतेच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास तत्पर असलेले प्रशासन राजकीय मंडळीच्या आदेशाने कारवाई करण्यास टाळाटाळ करत असेल अशावेळी सर्वसामान्य माणसाने दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

याबाबत आमचे प्रतिनिधी जितेंद्र घरात यांनी वसई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन सतत व्यस्त येत होता तर आयुक्त लोखंडे यांचा फोन बंद होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *