fbpx
Home > आरोग्यविषयक > सावधान : लहान मुलांमध्ये दिसतायेत कोरोनाची वेगळी लक्षणे

सावधान : लहान मुलांमध्ये दिसतायेत कोरोनाची वेगळी लक्षणे

ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास ही कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत. सुरुवातीला कोरोना विषाणूने जेष्ठ नागरिक आणि ज्यांना अगोदर पासून एखादा गंभीर आजार आहे अशा लोकांना गाठले होते. त्यानंतर हा आजार तरुणांपर्यंत पोहोचला. परंतु हा आजार आता लहान मुलांमध्ये देखील दिसू लागला आहे. महत्त्वाचे आणि धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांमध्ये याची लक्षणे थोडी वेगळी दिसून आली आहेत. असा अलर्ट ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने जारी केला आहे.

याबाबत नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने एक माहिती प्रसिद्ध केली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमध्ये आयसीयू मध्ये दाखल असलेल्या मुलांमध्ये अशी कित्येक प्रकरणं आहेत, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाला सूज, उलटी आणि डायरिया अशी लक्षणे समोर आली आहेत. अशी लक्षणं दिसणाऱ्या मुलांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती, त्यांना थेट आयसीयू मध्ये दाखल करावं लागलं. या सर्वांच्या कोरोना टेस्टही करण्यात आल्या, त्यापैकी काही मुलं कोरोना पॉझिटिव्ह निघाली. डॉक्टरांच्या मते, सर्व वयाच्या लहान मुलांमध्ये अशी लक्षणं दिसू लागलीत. गेले ३ आठवडे अशी प्रकरणं दिसून येत आहेत.

NHS शी संंबंधित डॉक्टरांनी याला सध्या इन्फ्लेमेट्री सिंड्रोम म्हटलं आहे. याचा संबंध कोरोनाव्हायरसशी असू शकतो, असंही ते म्हणाले.

या अलर्टमध्ये अशा लक्षणांची तुलना शॉक सिंड्रोम किंवा कावासाकी डिसीजशी करण्यात आली आहे. या दोन्ही आजारात शरीराच्या आतील अवयवांना सूज येते आणि कोरोनाच्या लक्षणाप्रमाणे ताप येतो, श्वास घेण्यात समस्या येते.

मुलांमध्ये कोरोना आणि कावासाकीशी मिळतीजुळती लक्षणं आहे, जे असामान्य आहे आणि त्याची तपासणी सुरू आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. जोपर्यंत यामागील नेमकं कारण समजत नाही, तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं योग्य नाही, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

पीडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर सोसायायटीच्या ट्विटनुसार लहान मुलांमध्ये शॉक सिंड्रोम, कावासाकी डिसीज आणि कोविड-19 या तिन्ही आजारांची गंभीर लक्षणं एकत्र दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या पोटात वेदना होणं ही एकप्रकारची एमर्जन्सी आहे.

ब्रिटनमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. एलिजाबेथ विटेकर यांनी सांगितलं, “अशीच प्रकरणं इटली, स्पेनसाराख्या देशांमध्येही दिसत आहेत, मात्र त्यांच्या संख्या कमी आहे. आतापर्यंत कोरोनाव्हायरसच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला होता. मात्र त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं डायरिया, पोटदुखी हीदेखील कोरोनाची लक्षणं आहेत, असं सांगितलं. तर दुसरीकडे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, वास न येणं, चव न लागणं हेदेखील कोरोना संक्रमणाचे संकेत आहेत”

भारतामध्ये अद्यापतरी याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही परंतु कोरोना विषाणूच्या धर्तीवर आपणसुद्धा आपल्या मुलांच्या तब्येतीकडे अतिशय बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. वरीलपैकी कोणताही त्रास मुलांमध्ये जाणवल्यास त्वरित जवळील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *