fbpx
Home > इतर घडामोडी > गायी चोरीच्या संशयावरून दोघांची हत्या

गायी चोरीच्या संशयावरून दोघांची हत्या

गायी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांना जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

रबीउल इस्लाम आणि प्रकाश दास असे मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे जण गुरुवारी माथाबंगामध्ये गायी घेऊन जात होते. गावकऱ्यांना चोरीचा संशय आला. जमावाने या दोघांना रोखले. व त्यांच्या गाडीची तपासणी केली. वाहनात जमावांना गायी दिसताच त्यांनी या दोघांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. जमावाने केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. जमाव इतक्यावरच थांबला नाही तर त्या वाहनाला आग लावली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पोलिसांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले परंतु, गंभीर जखमी झालेल्या या दोघांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. 

पश्चिम बंगालमध्ये गायींची तस्करी केली जात असल्याची अफवा पसरली होती. गायीची तस्करी केली जात असल्याचा संशय जमावाला आल्याने त्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली. तसेच वाहनाला आग लावली, असे पोलिसांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वीच यासंबंधीचे एक महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. या कायद्यांतर्गत संशयावरून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळू शकणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *