fbpx
Home > इतर घडामोडी > पालघरमध्ये भंगारातून तयार झाली सौरव्हॅन!

पालघरमध्ये भंगारातून तयार झाली सौरव्हॅन!

पालघर येथील आदिवासी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून तरुण विद्यार्थ्यांनी भंगारातून विकत घेतलेल्या एका वाहनाला सौरऊर्जेचा जोड देऊन गिअर सौरव्हॅनची निर्मिती केली. या व्हॅनमुळे सौरऊर्जेचा वापर करून व इंजिनमुळे निकामी झालेल्या वाहनांचा व्यवहारात पुन्हा वापर होणार आहे. तसेच ही सौरव्हॅन इंधन आणि प्रदूषण बचतीसाठी एक चांगला पर्याय असणार आहे.

पालघर येथील आदिवासी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून बनविण्यात आलेली सौरव्हॅन हा इंधन आणि प्रदूषण बचतीसाठी एक चांगला पर्याय असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला असून त्यांचे अभिनंदन होत आहे.

इंधनाचा अमर्याद वापर, वाढते प्रदूषण व यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणासाठी आदिवासी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालघर येथील निदेशक के. बी. आहेर यांना सुचलेल्या कल्पनेला त्यांच्या इलेक्ट्रिशियन विभागातील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्षात उतरवले.

भंगारातून विकत घेतलेल्या एका वाहनातून सौरऊर्जेचा वापर करून गिअर सौरव्हॅनची निर्मिती करण्यात आली. या तंत्रज्ञानामधून इंजिनमुळे निकामी झालेल्या वाहनांचा व्यवहारात पुन्हा वापर करता येऊ शकतो. कारण या सौरव्हॅनमध्ये इंजिन नसल्यामुळे इंधन वापरायचा प्रश्नच येत नाही. ही सौरव्हॅन दिवसा सौरऊर्जेवर चालते व रात्रीच्या वेळेसाठी त्यास बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

या प्रशिक्षण संस्थेत बहुतांश ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या व्यवसायात प्रशिक्षण घेतात. सौरव्हॅन बनविताना विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळाली. या उपक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य एस. एन. परदेशी आणि निदेशक जीवन पाटील व निदेशक डी. व्ही. गवस यांचे बहुमोल मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य लाभले.

सुमारे एक महिना सतत काम करून इलेक्ट्रिशियन विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या गाडीसाठी साधारपणे एक लाख रुपये खर्च आला आहे. आयटीआयच्या आवारात ठेवण्यात आलेली हा गाडी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *