fbpx
Home > इतर घडामोडी > वसई – विरारमधील वीज प्रश्नावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे देणार उत्तरे

वसई – विरारमधील वीज प्रश्नावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे देणार उत्तरे

loksatta-loudspeaker

वीज समस्यांवर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात मंथन : उद्या नालासोपाऱ्यात कार्यक्रम

वसई-विरारमधील वीज ग्राहकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी दैनिक लोकसत्तातर्फे, उद्या शुक्रवार २८ जून रोजी ‘लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. या वेळी वीज समस्यांवर मंथन केले जाणार आहे. नालासोपारा पूर्वेला तुळींज येथील दामोदर सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पडणार आहे.

वसई-विरार शहरात लाखो वीज ग्राहक आहेत. हे वीज ग्राहक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढीव वीज बिले ग्राहकांना येत आहेत. त्याचा आर्थिक भरुदड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. वीज ग्राहकांचे मीटर सदोष आहेत. ते बदलले न गेल्याने वीज ग्राहकांना वाढीव आणि चुकीची वीज बिले येत आहेत. शहरातील वीज वितरणव्यवस्था सदोष झालेली आहेत. जागोजागी उघडे रोहित्र आहेत. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत.

भारनियमन नसल्याचा दावा महावितरण करत असली तरी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे ग्राहकांच्या त्रासात भर पडलेली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा उघडय़ा आणि धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहेत. या तारा कोसळून दुर्घटनेची भीती आहे. दुसरीकडे वीजचोरीनेही महावितरण त्रस्त आहे. वीज चोरांमुळे महावितरणालाही आर्थिक फटका बसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महावितरण कार्यालयावर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे मोर्चे निघत आहेत. या पाश्र्वभूमीवर वसईतील वीज ग्राहकांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता’ करणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  या वेळी वसई विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.  ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्याची संधी या वेळी उपलब्ध होणार आहे. राज्यात  महावितरणाचे एकूण नऊ विभाग आहेत. वसई-विरार शहराचा समावेश कल्याण झोन विभागात होतो. वसईत दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पूर्व व पश्चिम आणि वाडा यांचा समावेश आहे. तर नालासोपारा उपविभागात विरार, नालासोपारा पूर्व, पश्चिम व आचोळे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला वीज ग्राहकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकसत्ता तर्फे करण्यात आले आहे.

‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी; तसेच वीज अभ्यासकांनी events.loksatta@expressindia.com या ई-मेलवर स्वत:चे नाव, संपर्क क्रमांक व संस्थेचे नाव नमूद करून पाठवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *