fbpx
Home > ठळक बातम्या > पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर जिल्ह्यातील काही भाग आज सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत.

पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या वर्षभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत आज सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. याबाबत ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी माहिती दिली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली. कोणतेही नुकसान झाल्याची अथवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, असंही त्यांनी सांगितलं. नोव्हेंबर २०१८ पासून वारंवार धुंदलवाडीला भूकंपाचे हादरे बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी या गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.९ इतकी होती.

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील गावांना गेल्या वर्षभरापासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. २५ जुलै रोजी ३.८ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसल्याने काही नागरिकांच्या घरांना लहान मोठे तडे गेले आहेत. त्यादृष्टीने डहाणूतील भूकंपप्रवण क्षेत्रात नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. या भूकंपप्रवण क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून भूकंपाचे धक्के बसत असून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक वेळा असे लहान-मोठे भूकंप झाले आहेत. यात अनेक आदिवासींच्या घरांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *