fbpx
Home > ठळक बातम्या > डहाणूत २५ गाईंचा मृत्यू, परिसरात खळबळ

डहाणूत २५ गाईंचा मृत्यू, परिसरात खळबळ

डहाणू तालुक्यातील माटगाव या गावाच्या शिवारात २५ गाईंचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

याबाबत महाराष्ट्र टाइम्स ने दिलेली बातमी अशी की, डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळच्या माटगाव गावाच्या परिसरांतील शेतात, गवतात आणि झाडाझुडपात अशा दूरवर विखुरलेल्या जागेत २५ गाई मृतावस्थेत आढळल्या. तथापि अजूनही शोधकार्य सुरू असल्याने मृत गाईंचा निश्चित आकडा समजू शकला नाही. या मोकाटगाई असल्याने त्यांना कोणी मालक नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला असावा, हे शवविच्छेदनानंतरच समजणार आहे.

माटगावच्या आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, मिरची बागायती आहेत. त्यांत भाजीपाला किंवा अन्य पिकांची लागवड केली जाते. रात्रीच्या सुमारास ६० ते ७० मोकाट गाईंचा तांडा कुंपण तोडून किंवा उड्या मारून बागेत घुसतात आणि संपूर्ण बागच्या बाग फस्त करून टाकतात. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते. याला कंटाळून हे बागायतदार एखाद्या वांग्यात अथवा भाजीपाल्यात थायमेटसारखे जहाल कीटकनाशक भरून, बागेच्या बाहेर लांबवर फेकून देतात. ती खाऊन गुरे मरतात. ही एक शक्यता असून, काही बागायतदार भाजीपाला लागवडीवर कीटकनाशकांची फवारणी करतात. हा भाजीपाला गुरांनी खाल्यानंतर गुरे मृत होतात. ही दुसरी शक्यता आहे. यामुळे या गाई मृत झाल्याची दाट शक्यता आहे.

याबाबत वाणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश पगारे आणि सहाय्यक पोलिस उप निरीक्षक कुमार आवटे यांनी शोधकार्य सुरू केले असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच मृत गाईंच्या विल्हेवाटीसाठी खड्डे खोदण्याकरता, जेसीबी मशीनही मागविण्यात आले आहे. त्यामुळे शोध कार्य पूर्ण झाल्यावरच, मृत गाईंचा निश्चित आकडा समजू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *