fbpx
Home > ठळक बातम्या > खासदार राजेंद्र गावित यांच्या समोर वसई विरारच्या रेल्वे प्रवाशांनी वाचला तक्रारींचा पाढा

खासदार राजेंद्र गावित यांच्या समोर वसई विरारच्या रेल्वे प्रवाशांनी वाचला तक्रारींचा पाढा

वसई तालुक्यातील नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार या रेल्वे स्टेशनांमधून लाखो रेल्वे प्रवासी दररोज प्रवास करतात. दररोज रेल्वेला मोठे उत्पन्नही येथून मिळत असले, तरी अजूनही छोट्या मोठ्या रेल्वे समस्या कायम आहेत. सोमवारी पश्चिम रेल्वेच्या डीआरएमसोबत पालघरच्या खासदारांनी या चारही रेल्वे स्टेशनांची पाहणी केली. या चारही रेल्वे स्टेशनांमध्ये प्रवाशांनी तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे आपल्याला या समस्यांवर उत्तर हवे व वेळेत अंमलबजावणी हवी, असे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले.

वसई तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. दिवसेंदिवस प्रवास जीवघेणा होत असून वसई पट्ट्यातून मुंबईला सकाळी व सायंकाळी जायचे यायचे म्हणजे गुदमरून प्रवास करावा लागतो. यामुळे खासदार गावित यांनी पश्चिम रेल्वेचे डीआरएम संजय मिश्रा यांच्यासह रेल्वे स्टेशनांची पाहणी केली.

नायगाव :-

नायगाव रेल्वे स्टेशनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. नायगाव पूर्वेला रेल्वे स्टेशनजवळ तिकीट घर अगदी छोटे असून, रांगेत उभे राहण्यासाठी जागा नसल्याने प्रवाशांची भांडणे होतात. मुख्य रस्त्यात रांग पोहोचते इतकी गर्दी होते. येथे नव्याने तिकीट खिडकी बांधून दिवस-रात्र ती खिडकी सुरू ठेवावी. रात्री बंद असणारी येथील तिकीट खिडकी पूर्ण वेळ सुरू ठेवावी, अशी मागणी राजेंद्र गावित यांनी केली. नायगावच्या भूमीगत मार्गात (सब-वे) सीसीटीव्ही कॅमेरे, दिवे लावावेत व सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर स्वच्छतागृह स्वच्छ करावे, अपंगांसाठी असलेले स्वच्छतागृह सुरू करावे, नायगाव पूर्वेला पार्किंगची सोय करावी, पूर्वेला प्रवाशांसाठी टॉयलेट उभारावे, नायगाव रेल्वे स्टेशनात पूर्व व पश्चिमेला जादा तिकीट खिडक्या सुरू कराव्यात. नायगाव स्टेशनातून सकाळी प्रवाशांच्या सोयीच्या वेळेनुसार किमान अर्ध्या तासांच्या अंतराने तीन चर्चगेट लोकल सुरू कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. नायगाव स्टेशनात रेल्वेच्या जागेत नवीन तिकीट खिडकी करण्यात येईल व इतरही कामे केली जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

वसई रोड :-

वसई रोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून येथील प्रवासी संघटना व प्रवाशांनी आपल्या मागण्या केल्या. रेल्वे प्रवासी वेलफेयर सोसायटीचे शेखर धुरी यांनी वसई रोड मधील प्रवाशांच्या वतीने लेखी सूचना दिल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक ६-७ वर शेड नसून येथे कॅन्टीन व पोलिस चौकीची आवश्यकता आहे. रेल्वे पोलिसांचे कार्यालय रेल्वे स्टेशनपासून खूप दूर असल्याने ते रेल्वे स्टेशनात सुरू करावे, अपंग व वृद्ध प्रवाशांसाठी लिफ्ट लावण्यात याव्यात अशी सूचना त्यांनी केल्या. वसई रोडच्या स्टेशनात प्लॅटफॉर्मवर अधिकृत हमालांची सोय व्हावी, वसई स्टेशनात सीसी कॅमेरे, सफाई कामगार वाढवावेत, वसई ते चर्चगेट महिला लोकलची संख्या वाढवावी, विरार ते छत्रपती शिवाजी टर्मिनस लोकल सुरू करावी, डहाणू-चर्चगेट महिला लोकल सुरू करावी, अशा मागण्या धुरी यांनी केल्या. त्यासह वसईच्या विविध समस्या त्यांनी लेखी स्वरूपात दिल्या आहेत.

नालासोपारा :-

सर्वाधिक प्रवासी नालासोपारा रेल्वे स्टेशनातून प्रवास करतात. नालासोपारा स्टेशनातून पश्चिमेला बाहेर पडण्यासाठी आणखी एक एक्झिट (प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मार्ग) असावा, तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, नालासोपाऱ्यात स्वच्छ टॉयलेटची संख्या वाढवावी, रेल्वेच्या जागेत बसणारे अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या नालासोपाऱ्यातील प्रवाशांच्या वतीने राजन नाईक व मनोज पाटील यांनी केल्या.

विरार :-

विरार रेल्वे स्टेशनातही खासदार व रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. या रेल्वे स्टेशन पाहणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ‘हा शासकीय पाहणी दौरा असून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करू नये, थेट प्रवाशांना अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडू द्या’ असे सुरुवातीलाच खासदारांनी सांगितले.

पुन्हा आढावा

यावेळी प्रवासी संघटनांच्या वतीने लेखी निवेदने रेल्वेला देण्यात आली. सर्व निवेदने आपण स्वीकारली असून आपल्या स्तरावरील कामे तत्काळ करण्यात येतील. दिलेल्या निवेदनांची लेखी उत्तरे देऊ, असे डीआरएमनी सांगितले. तर रेल्वे स्टेशनांची आम्ही पाहणी केली व पुढे काहीही झाले नाही असे व्हायला नको. हा फक्त शो किंवा फार्स व्हायला नको तर या चारही रेल्वे स्टेशनात कामे व्हायला हवीत, अशी अपेक्षा खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली. यापुढे पुन्हा रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन येथील कामांबाबत चर्चा केली जाणार आहे.

ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदल नको

अनेकदा नेहमीच्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म ऐनवेळी बदलले जातात. वेगळ्या प्लॅटफॉर्मवर गाडी येत असल्याची उद्घोषणा झाल्यानंतर प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी धावपळ होते. महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना धावता येत नाही. त्यामुळे प्लॅटफॉर्म एकतर बदलू नयेत व इतर प्लॅटफॉर्मवर गाडी येणार असल्यास त्याची माहिती आधीच प्रवाशांना मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *