fbpx
Home > अपघात > विरारमध्ये रिसॉर्टमधील स्वीमिंगपूलमध्ये पडून मुलीचा मृत्यू

विरारमध्ये रिसॉर्टमधील स्वीमिंगपूलमध्ये पडून मुलीचा मृत्यू

विरारमधील अर्नाळा येथील सागर रिसॉर्टमध्ये असलेल्या स्वीमिंगपूलमध्ये बुडून एका ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक नुकतीच घडली आहे. आफिया असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून, ही घटना शुक्रवार ७ जून रोजी दुपारी घडली.

मालाड येथील २२ जणांचा एक ग्रुप सहलीसाठी सागर रिसॉर्टमध्ये गेला होता. यामध्ये ६ मुलांचा समावेश होता. दुपारच्या जेवणानंतर १२ मोठी माणसं आणि ६ लहान मुलं स्वीमिंगपूलमध्ये उतरली. काहीवेळानंतर एक लहान मुलगी बुडत असल्याचे अन्य पर्यटकांच्या लक्षात आले. अन्य लोकांच्या मदतीने बुडणाऱ्या आफियाला बाहेर काढण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सागर रिसॉर्टमध्ये एकही जीवरक्षक नव्हता, असा आरोप या मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. स्वीमिंगपूलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त माणसं होती. रिसॉर्टमधील कर्मचारी अन्य पर्यटकांमध्ये व्यस्त होते. या रिसॉर्टमध्ये ३ स्वीमिंगपूल आणि १७ वॉटर स्लाइड्स असून, सर्वत्र मोठी गर्दी होती, अशी माहिती कुटुंबातील एका सदस्याने दिली. ईद साजरी करण्यासाठी सदर कुटुंब सहलीसाठी गेले होते. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अर्नाळा पोलिसांनी सागर रिसॉर्टचा मालक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली असून, निष्काळजीपणामुळे हा प्रसंग ओढवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *