fbpx
Home > ठळक बातम्या > अरबी समुद्रात चक्रीवादळाचा इशारा, मासेमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

अरबी समुद्रात चक्रीवादळाचा इशारा, मासेमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

हवामान विभागाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण पूर्व भागातील अरबी समुद्र, लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची शक्यता वर्तवली असून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारांनी ११ आणि १२ जून रोजी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच, १२ आणि १३ जून असे दोन दिवस अरबी समुद्रात उत्तर पूर्व भागात आणि गुजरातच्या किनाऱ्यावरही ‘वायू’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता असून खोल समुद्रात गेलेल्यांनी तत्काळ माघारी यावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

आज संध्याकाळी अरबी समुद्रात सुमारे ताशी ११५ किमीच्या वेगाने वारे घोंघावणार आहेत. तर दक्षिण महाराष्ट्राजवळील समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी ६० किमी इतका असणार आहे.

उद्या १२ जून या दिवशी वाऱ्याच्या वेगात वाढ होणार असून ताशी १२० ते १३५ किमीच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून गुजरातच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी १३५ किमीपर्यंत पोहोचणार आहे. तर, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ७० किमी पर्यंत पोहोचणार आहे.

१३ जून रोजी वादळाचा वेग काहीसा कमी होणार आहे. उत्तर अरबी समुद्रात तसेच गुजरातच्या किनारपट्टीवर सुमारे ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहणार असून हळू हळू वादळाचा वेग मंदावणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्याच्या किनारपट्टीवर समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *