fbpx
Home > इतर घडामोडी > पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान

पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान

शनिवारी पहाटेपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सूर्या, वैतरणा, तानसा, देहर्जा, पिंजाळ या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी छोटे पूल तुटले असून रस्ते खचले आहेत. शनिवारी सकाळपासून विक्रमगड-जव्हार, मनोर-विक्रमगड, डहाणू-विक्रमगड, मनोर-वाडा तसेच पालघर-बोईसर, सफाळा-पालघर, मनोर-पालघर मार्गांवरील वाहतूक बंद पडली आहे. वसई, विरार, नालासोपारा, सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, डहाणू आदी विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे.

विक्रमगड-जव्हार मार्गावरील साखरा पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि जव्हारचा संपर्क तुटला आहे. मनोर-विक्रमगड रस्त्यावर पुलावरून पाणी गेले आहे. विक्रमगड तालुक्यातील खुडेद गावच्या कुडांचा पाडा येथे राहणारा साखरा येथे दहावीत शिकणारा सिताराम शिवराम चौधरी हा विद्यार्थी शुक्रवारी सांयकाळी तिवसपाडा नदीच्या पुरात वाहून गेला. त्याचा शोध सुरू आहे. वाडा तालुक्यातील तानसा नदीवरील केल्ठन-वज्रेश्वरी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली आहे. येथे पुलावरून एक मिटर उंचीवरून पाणी वाहत आहे. मनोर पोलिस ठाण्याजवळील कोळशे पूल पाण्याखाली गेला आहे. पालघर- मनोर रोडवरील सूर्या नदीच्या जुन्या पुलावर आठ फुटांहून अधिक उंचीवरून पाणी वाहत आहे. सफाळे व वैतरणा स्थानकांदरम्यान वैतरणा नदीप्रवाहातील वाढीव बेट पाण्याखाली गेले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. इथे शासकीय यंत्रणा अद्यापही पोहोचली नाही.

डहाणू तालुक्यातील कासा-वरोती येथील पुलावरून पाणी वाहत असून इथे चार गुरे नदीच्या प्रवाहात वाहून गेली. परंतु एक गाय पुलावरून माघारी फिरल्याने ती बचावली.

डहाणू तालुक्यातील वाढवणच्या समुद्रात शंखोदर परिसरातील खडकांमध्ये सुरत येथील नंदअपर्णा मालवाहू जहाज वादळी वाऱ्यांमुळे भरकटल्याने अडकून पडले आहे.

वाडा तालुक्यातील गालतरे इथे सहलीला आलेले मुंबईतील आदित्य कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधील ७० विद्यार्थी हमरापूर ते गलतारे रस्ता खचल्याने शुक्रवारपासून अडकून पडले होते. मात्र त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

आठ दिवसांपासून सततच्या पावसाने भातशेती पाण्याखाली गेल्याने पीक कुजण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

दरम्यान हवामान खात्याने रविवार ४ ऑगस्टसाठीही पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १५७ मिमी पाऊस झाला. शनिवारी दुपारी १ वाजल्यापासून धामणी आणि कवडास धरणांमधून ४२ हजार ५०० घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी ०२५२५–२९७४७४ किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांच्याशी ९१५८७६०७५६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *