fbpx
Home > ठळक बातम्या > देशात आणखी दोन आठवड्यांनी वाढला लॉकडाऊन

देशात आणखी दोन आठवड्यांनी वाढला लॉकडाऊन

लॉकडाऊन संपायला आता फक्त २ दिवस राहिले आहेत. सुरुवातीला २१ दिवसांचा आणि नंतर वाढ करून पुन्हा १९ दिवसांचा लॉकडाऊन देशात लावण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली होती. तो लॉकडाऊन आता ३ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर काय उपाययोजना कराव्यात यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करून हा लॉकडाऊन वाढवला आहे. आता देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने Disaster Management Act 2005 नुसार हा लॉकडाऊन वाढवला आहे. त्याच बरोबर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनसाठीही केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

देशात कोरोना व्हायरस नियंत्रणात असला तरी, रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. काही दिवस रुग्ण कमी दिसतात तर, एखाद्या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणवर रुग्ण वाढताना दिसत आहेत. देशात सध्या ३५ हजारहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. देशातील लोकसंख्या पाहिली तर, हा आकडा नियंत्रणात असल्याचा दावा काहीजण करत असले तरी, रुग्ण वाढीचा वेग रोखणे हे सगळ्यांत मोठे आव्हान आहे. सध्या महाराष्ट्रात देशातील सर्वाधित १० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यातही मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये रुग्णांची संख्या आणि कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळं ही बाब चिंतेची ठरत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्याचे संकेत दिले होते. पण, जर गर्दी वाढू लागली तर, निर्बंध आणखी कडक करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता केंद्रीय गृहमंत्रालयानेच लॉकडाऊनमध्ये वाढ केल्याने महाराष्ट्रात काय निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता आहे. मुळात केंद्राचे लॉकडाऊनचे आदेश राज्यांना टाळता येणार नाहीत, असे केंद्राने यापूर्वीही स्पष्ट केले होते. त्यामुळं आता राज्यातील ग्रीन झोनमधील लॉकडाऊन शिथील होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रात मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला  हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. राज्यातली काही जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट वगळून इतर व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा होती. पण, देशातील लॉकडाऊनच वाढवण्यात आल्यानं आता या रेड झोन पट्ट्यातील व्यवहार सुरू होण्याच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *