fbpx
Home > ठळक बातम्या > गुजरातमध्ये अडकलेल्या पालघरच्या खलाशांना एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत

गुजरातमध्ये अडकलेल्या पालघरच्या खलाशांना एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत

पालघर जिल्ह्यातील गुजरात राज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले आदिवासी समाजातील खलाशी भुकेने व्याकुळ झाले आहेत, महाराष्ट्र शासनाला गुजरात सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत या खलाशांना पडली असून ते अन्नाला पोरके झाले आहेत असह्य समस्यांशी लढा देत माणुसकी संपल्याची भावना ते व्यक्त करत आहेत,

गुजरात राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील वेरावळ, पोरबंदर, सौराष्ट्र, ओखा अश्या २५ ते ३० विविध बंदरात पालघर जिल्ह्यातील विविध खलाशी मरणयातना भोगत असून प्रशासन आणि लोकप्रतींनिधींनी वार्‍यावर सोडल्याची भावना या पिडीत खलाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान जीवनावश्यक सेवा मिळविण्यात अडचणी येत असल्याने दैनंदिन जीवन असह्य झाल्याची भावना ते पालघरातील पत्रकारांशी संपर्क साधून डोळ्यातील अश्रू टाकत व्यक्त करत असून या भावना व्यक्त करताना आपली कुटुंब कसे जीवन जगत असतील या विचाराने त्यांना सतावले जात आहेत,

पालघर जिल्ह्याच्या मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, पालघर अश्या विविध तालुक्यातील सुमारे २५ ते ३० हजार आदिवासींच्या खलाशी हे गुजरात राज्यातील बंदरात कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने फसले आहेत. त्यापैकी काही खलाशांनी सीमा भागापर्यंत येण्याची धडपड केली, मात्र लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेमुळे त्यांना अपयश आले आहे.

या खलाशांनी ते ज्या ठिकाणाहून आले त्याच बंदरात जाऊन आश्रय घेतला आहे. एकट्या वेरावल बंदरात सुमारे ८ ते १० हजार खलाशी पालघर जिल्हावासीय असून तेथे जीवनावश्य वस्तूंचा तुटवडा आहे. बोट मालकांनी दिलेलं तुटपुंजे अन्न-धान्य अर्धेपोटी एक वेळच खाऊन दिवस ढकलावा लागत आहे, तर अन्य बंदरातील खलाशांची परिस्थिती देखील यापेक्षा चांगली नसल्याची सांगण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पालघर जिल्ह्यातील या आदिवासी खलाशांनी ते ज्याठिकाणी कामासाठी गुजरात मध्ये गेले आहेत, त्याच ठिकाणी त्यांनी परत जावे तेथे त्यांच्या राहण्याची व भोजन आदींची सुविधा गुजरात सरकार मार्फत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र यातील कोणतीही बाब गुजरात सरकारने केली नसल्याचे या खलाशांनी सांगितले,

त्यामुळे पालकमंत्री व येथील स्थानिक प्रशासनाने कोणतीही मदत केलेली नाही. कित्येक दिवस आंघोळ केलेली नसून लहान-सहान आजाराबाबत आरोग्य तपासणीही झालेली नसल्याचे हे खलाशी म्हणत आहेत.

एक-एका बोटीत दाटीवाटीने खलाशी राहत असून बोटीतच नैसर्गिक विधी आटोपले जातात. त्यामुळे दुर्गंधी, आजाराची भीती सतवते आहे. एकाच ठिकाणी हजारो खलाशी असून दैनंदिन समस्या, घरी जाण्याची लागलेली ओढ यामुळे मानसिक संतुलन ढासळत असल्याने छोट्या-मोठ्या कुरबुरी घडून भांडणाचे प्रसंग दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे तिथे सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

बोट मालका व्यतिरिक्त तेथील स्थानिक प्रशासनाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. स्मार्ट फोनच्या माध्यमातून विविध बंदरातील खलाशी एकमेकांशी आणि कुटुंबीयांशी संवाद साधत आहेत. सोशल मीडियाचे संदेश, बातम्या तसेच पालघर जिल्ह्यातील पत्रकारांकडून मिळणारी सहानभूती जगण्याला बळ देत असल्याचे सांगत आहेत.

अनेकजण भावनाविवश झाल्याने त्यांना रडू कोसळत असल्याचे हे खलाशी म्हणतात. हा अनुभव एखाद्या सिनेमात ओलीस ठेवल्याच सीन दाखवीलं जात त्याच प्रमाणे आम्ही हे खरंखुरं अनुभवत आहोत. मात्र पालघर जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदयांना त्याचे सोईरसुतक नसल्याचा आरोप खलाशांनी केला आहे.

पालघर जिल्ह्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या या आदिवासी खलाशाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकार काही ठोस भूमिका घेऊन केंद्रा पर्यंत हा प्रश नेट नाही आणि गुजरात सरकार या खलाशाना सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय करत नाही तो पर्यंत या खलाश्याच काही खर दिसत नाही,विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील या आदिवासी खलशाची अवस्था आई जेवू घालिना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली असल्याचे मत या खलाश्यानी व्यक्त केलं आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *