fbpx
Home > अपघात > औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडून ठार झाल्याचा भीषण अपघात आज पहाटे ५.१५ वाजता झाला. यात २ मजूर गंभीर जखमी असून, तिघे जीव वाचविण्यात यशस्वी ठरले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले होते. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी भुसावळ येथून मध्य प्रदेशला जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केली असल्याची माहिती या मजुरांना मिळाली. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी हे मजूर रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. धर्मेंद्र सिंह, ब्रिजेंद्र सिंह, निर्बेश सिंह, धन सिंह, प्रदीप सिंह, राज भवन, शिव दयाल, नेमसहाय सिंह, मुनिम सिंह, बुधराज सिंह, अचेलाल, रविंद्र सिंह या मजुरांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

जालना येथील स्टील कंपनीचे १९ कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वेरुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. – सुरज नेहुल, उपविभागीय पोलीस अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *