fbpx
Home > इतर घडामोडी > महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोना व्हायरसने देशाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून सुरु होत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांहून हा चौथा टप्पा वेगळा असणार आहे, असं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जाहीर केलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्र लॉकडाऊन ४ मध्ये कसा असेल याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झी २४तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

यावेळी टोपे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे  मांडले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ग्रीन झोन पूर्णपणे सुरु राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, ऑरेंज झोनमध्येसुद्धा कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर भाग हा सुरु केला जाऊ शकतो. राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच अंशी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते.

एखादा भाग रेड झोनचा जिल्हा असला तरीही अशा ठिकाणी कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्व भागांमद्ये व्यवसाय आणि उद्योग पूर्णपणे सुरु रहावेत असं आपलं ठाम मत असल्याचं राजेश टोपे म्हणाले. रेड झोनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना इतरत्र वावरण्याची मुभा मिळणार नाही हा अतिशय महत्त्वाच मुद्दा त्यांनी स्पष्ट केला. कोणीही उठावं कुठेही फिरावं, असं बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

लॉकडाऊनच्या या टप्प्यात ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अनेक कारभार सुरु करावे लागतील. पण, यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा मंत्र मात्र आवर्जून पाळला गेलाच पाहिजे हाच मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा कुठेही उडवला जात असल्याचं लक्षात आल्यास त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले नियम पुन्हा कठोर करण्यात येतील अशी माहिती टोपे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे सर्व अधिकार असल्याची बाब त्यांनी मांडली.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर त्यातही जर कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसला तर, ऑरेंज आणि ग्रीन अशा झोमध्येही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात येईल असं म्हणत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही निर्णय घेतले जाणार असले तरीही यामध्ये नागरिकांचे प्राणही त्याहून महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सुवर्णमध्य साधतच पुढची पावलं उचलली जाणार असल्याचे राजेश टोपे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *