fbpx
Home > तंत्रज्ञान > फेक न्यूजप्रकरणी कंपन्यांच्या प्रमुखांवर कारवाई?

फेक न्यूजप्रकरणी कंपन्यांच्या प्रमुखांवर कारवाई?

भारतातल्या ग्लोबल इंटरनेट आणि सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रमुखांना कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते. कंपन्यांच्या व्यासपीठाचा वापर करून जर कोणी फेक न्यूज पसरवल्या किंवा लिंचिंग, दंगल भडकवणाऱ्या बातम्या पसरवल्या, भावना भडकवणारा प्रसार केला तर त्यासाठी त्या इंटरनेट कंपन्या किंवा सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रमुखांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस सरकारच्या एका उच्चस्तरीय समितीने केल्याचे समजते.

या मंत्र्यांच्या समितीचे प्रमुख गृहसचिव राजीव गौबा असून त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना अहवाल सादर केला आहे. देशभरात घडलेल्या झुंडबळी (मॉब लिंचिंग) सारख्या घटना, फेक न्यूज आणि इंटरनेटचं व्यासपीठ आदींची भूमिका याचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे.

सोशल मीडियाचं व्यासपीठ कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा समुदायाच्या भावना भडकवणारे मेसेज पसरवण्याचे माध्यम होऊ नये, यासाठी सर्व शक्य ती पावले उचलायला हवीत याबाबत गटाच्या सदस्यांमध्ये एकमत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र या टप्प्यावर या केवळ शिफारशी आहेत. अंतिम शिफारशी गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर केल्या जाणार आहेत.

समितीने अहवाल सादर करण्यापूर्वी सोशल मीडिया, इंटरनेट कंपन्यांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली आहे. व्हॉट्स अॅपसारख्या मेसेंजरच्या माध्यमांनी अफवा पसरवणाऱ्या मेसेजना वेळीच रोखण्याची जबाबदारी उचलली पाहिजे यावर या सर्वांचं एकमत आहे. झुंडबळीच्या घटना घडल्या त्या प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचीही समितीने भेट घेतली.

या समिती अहवालाच्या काही दिवस अगोदरच न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या पॅनेलने डेटा चोरीबाबतचा अहवाल दिला आहे आणि डेटा चोरीच्या प्रकाराबद्दल दोषी कंपन्यांना पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. फेसबुक, टि्वटर, गुगल आणि व्हॉट्स अॅप या कंपन्यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर वॉच ठेवणार असल्याचे आश्वासन सरकारला दिले आहे. पण अद्याप त्यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *