fbpx
Home > इतर घडामोडी > वसई-विरारमध्ये पकडले सहा नायजेरियन नागरिकांना

वसई-विरारमध्ये पकडले सहा नायजेरियन नागरिकांना

वसई-विरार शहरातील नायजेरियन नागरिकांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तुळींज पोलिस ठाण्यात अनधिकृतपणे विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या सहा नायजेरियन व्यक्तींवर कारवाई केली आहे.

तुळींज पोलिसांतर्फे पासपोर्ट, व्हिसा नसलेले तसेच व्हिसाची मुदत संपलेली असतानादेखील अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या सहा नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. याविरोधात तुळींज पोलिस ठाण्यात परकीय नागरी कायदा १९४६ चे कलम १४ (अ), (ब)सह परकीय नागरिक आदेश १९४८चे कलम ७, ३ व पारपत्र अधिनियमचे कलम १२(क)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तुळींज पोलिसांनी सांगितले.

वसई-विरारसह मिरा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. याशिवाय बांग्लादेशी नागरिकसुद्धा छुप्या पद्धतीने रहात आहेत. गेल्या काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांचा उपद्रव वाढला आहे. अनेक गुन्ह्यांत नायजेरियन नागरिकांचा समावेश आढळून येत आहे. अंमली पदार्थांचे व्यवहार, ऑनलाइन फसवणुकीच्या व्यवहारात या बांग्लादेशी नागरिकांचा सक्रिय सहभाग आहे. याशिवाय त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थाही धोक्यात येत आहे. यासाठी पालघर पोलिसांनी नायजेरियन व्यक्तीच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी संपूर्ण पालघर जिल्ह्यात पुढील दोन महिन्यांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ (१)(२) अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत. परदेशी नागरिकांची शहानिशा करूनच परदेशी नागरिकाला घर, दुकाने, हॉटेल व जमीन भाड्याने देण्यापूर्वी त्यांचा रीतसर भाडेकरार करून नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती दिल्याशिवाय भाड्याने देऊ नये, असे आदेश पालघर पोलिसांनी दिले आहेत. त्याचसोबत यापूर्वी घर भाडेतत्त्वावर दिले असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिस ठाण्यात देण्यात यावी, असेही आदेश आहेत. स्थानिक नागरिकांकडून या नियमांचा भंग झाल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार पोलिसांनी नायजेरियन लोकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *