fbpx
Home > आरोग्यविषयक > शाळेच्या आवारात गुटखा, तंबाखू खाणारा शिक्षक होणार निलंबित – जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

शाळेच्या आवारात गुटखा, तंबाखू खाणारा शिक्षक होणार निलंबित – जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या २०० मीटर यार्ड परिसरात गुटखा किंवा तंबाखू खाताना आढळणाऱ्या शिक्षकास त्वरित नोकरीवरून निलंबित करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा शंभर टक्के तंबाखूमुक्त झाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न झाले पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी बुधवारी दिल्या.

आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर घेण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय समन्वय सभेमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेत असताना डॉ. शिंदे यांनी हे आदेश दिले. यावेळी आयुष्मान भारत योजनेचा आढावा घेताना राज्यात पालघर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक असून याच गतीने काम कायम ठेवून लवकरात लवकर आपले ध्येय पूर्ण करावे. तसेच यासंदर्भात दर पंधरा दिवसांनंतर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सुचित केले.

बालकांमध्ये आजारपणात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत असलेल्या मिशन इंद्रधनुष्य या योजनेचा आढावा घेतेवेळी डिसेंबरपासून चार महिने राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जिल्हा स्तरावर व वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राचे पूर्ण सर्वेक्षण करून वंचित राहिलेले व गळती झालेले लाभार्थी शोधून काटेकोरपणे सदर मोहिमेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू व सनियंत्रण समितीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. हत्तीरोग, हिवताप व जलजन्य रोग या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेताना हिवताप, हत्तीरोग निर्मूलनासाठी नियमित प्रसिद्धीपत्रक काढून योग्य ती जनजागृती करण्यात यावी तसेच महाविद्यालयांमधून यांसारख्या विषयावर पथनाट्य, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व इतर अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले, बोगस डॉक्टर इ. विषयांवर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील, तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वसई-विरार महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *