fbpx
Home > इतर घडामोडी > वसई-विरारची तहान भागवणार खोलसापाडा धरण?

वसई-विरारची तहान भागवणार खोलसापाडा धरण?

‘खोलसापाडा’ पाणीपुरवठा प्रकल्पाचे पाणी वसई-विरार शहरासाठी आरक्षित करण्याच्या आणि प्रकल्पासाठी होणाऱ्या आर्थिक खर्चाच्या प्रस्तावास महापालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे पालिकेला लवकरच पेल्हार आणि पापडखिंडनंतर वसई-विरारची तहान खोलसापाडा धरण भागवणार आहे.

वसई-विरार पालिका क्षेत्रात लोकसंख्या सातत्याने वाढत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून महापालिका वेगवेगळ्या पाण्याच्या योजनांवर काम करत आहे. सूर्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर पालिकेने स्वतःचे देहरजा धरण उभारण्याचे काम सुरू केले आहे. तर दुसऱ्या बाजूला राजावली, तिल्हेर व सातिवली याठिकाणी साठवण तलावाच्या कामांना गती दिली असतानाच आता खोलसापाडा लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचा आणि आर्थिक खर्चाचा ठराव मंगळवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी भविष्याच्या पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे.

खोलसापाडा हा प्रकल्प वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगत असल्याने प्रकल्पाचे शंभर टक्के पाणी वसई-विरार शहरासाठी आरक्षित केल्यास या भागातील गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी एकूण अंदाजे ११० कोटी निधीची आवश्यकता आहे. तसेच महानगरपालिकेची वाढती लोकसंख्या व विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अनुषंगाने येथील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. मुख्यतः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस २१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देणे पालिकेला सोयीस्कर होणार आहे. खोलसापाडा १ या पाटबंधारे प्रकल्पास वसई-विरार शहर महानगरपालिका पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याबाबत व प्रकल्पाचा अंदाजे ११० कोटींचा खर्च मंजूर करण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या सभेत ठेवण्यात आला होता. या सभेत प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करण्यास आणि आर्थिक खर्चास मंजुरी मिळाल्याने कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि त्यामार्फत शासनाकडे वसई-विरार शहर महानगरपालिका शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.

खोलसापाडा-१ या योजनेअंतर्गत पाण्याच्या साठ्याची व्याप्ती ७.८० चौकिमी असणार आहे. तर त्यात एकूण पाणीसाठा १३.०६४ दलघमी असणार आहे. पिण्यासाठी १२.८१८३ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाची १००% मालकी महानगरपालिकेची असेल. तसेच धरणातील १००% पाणी महानगरपालिकेसाठी आरक्षित राहील.

पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *