fbpx
Home > इतर घडामोडी > वसई महामार्गावरील प्रवास धोकादायक

वसई महामार्गावरील प्रवास धोकादायक

वसईजवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र या मार्गावर मार्गदर्शक पट्टे दिसत नाहीत. वाहने दिशा भरधाव वेगात धावताना दिसतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून मार्गदर्शक पट्टे लावण्याची मागणी वाहनचालकांतर्फे जोर धरू लागली आहे.

मुंबई ते अहमदाबाद महामार्गावर रोजच चारचाकी, ट्रक व अन्य अवजड अशी हजारो वाहने महामार्गाचा वापर करून इच्छित स्थळ गाठत असतात. मात्र, भटक्या जनावरांचा वावर, उड्डाणपूल आणि पथदिव्यांचा अभाव त्याचबरोबर सुरक्षित जाळ्या नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात म्हणजेच वसई सातिवली, खानिवडे टोल नाका या रस्त्यांवर मार्गदर्शक पट्टेच नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी असतात, सोबत वाहतूककोंडीही असल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या मार्गावर दुचाकीने प्रवास करणारेही अनेकजण आहेत. अवजड वाहने नजीक येताच त्यांची भीतीने तारांबळ उडते. अनेकदा वाहने घसरणे, अपघात होणे अशा घटना घडतात. थंडी सुरू झाल्याने मार्गावर धुकेही असते. अशा वेळेस मार्गदर्शक पट्टे नसल्याने अडचणीत वाढ होत आहे.

त्यातच एखादी दुर्घटना घडल्यास महामार्गावर इस्पितळ नसल्याने मुंबई किंवा वसईच्या रुग्णालयात नेण्यासाठी अधिक वेळ लागतो यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा धोकादायक रस्त्यांवरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर मार्गदर्शक पट्टे लावण्याची मागणी मागणी वाहन चालक करीत आहेत.

सोर्स : महाराष्ट्र टाईम्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *