fbpx
Home > इतर घडामोडी > १५०० किमी चालत गावी पोहोचलेल्या वसईच्या मजुराचा झाला मृत्यू

१५०० किमी चालत गावी पोहोचलेल्या वसईच्या मजुराचा झाला मृत्यू

लॉकडाऊन दरम्यान मुंबई तसेच वसई विरार मधील अनेक महाराष्ट्र बाहेरील मजुरांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला. त्यामध्ये काहींनी मिळेल ते वाहन पकडून तर काहींनी हजारो किमीचा प्रवास अक्षरशः पायी चालत केला परंतु असाच वसई येथे राहणाऱ्या एका मजुराची  १५०० किमी चे अंतर पायी चालत आणि आपल्या मूळ गावी पोहोचताच अवघ्या काही तासांत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेश येथील श्रावस्ती येथे झाली.

या मजुरांचे नाव इंसाफ अली असे आहे. तो वसई येथे राहणारा असून तो पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मूळगावी श्रावस्तीसाठी वसईहून निघाला होता. वाटेमध्ये याला अन्न व पाणीसाठी जीवाची पराकाष्ठा करावी लागली अशा परिस्थितीचा सामना करत १५०० किमी चालल्यानंतर सोमवारी तो आपले गाव मत्खनवा येथे पोहोचला.

श्रावस्तीचे पोलिस अधीक्षक अनुप कुमार सिंह यांनी सांगितले की, अली सकाळी सातच्या सुमारास मत्खनवा येथे आला त्यानंतर येथील स्थानिक शाळेमध्ये त्याची आवश्यक चाचण्या केल्यानंतर त्याला सोडण्यात आले. तत्पूर्वी त्याला चहा व नाश्ता देण्यात आला. त्यानंतर त्याने विश्रांती केली, परंतु, पाच तासांनंतर त्याने वरच्या ओटीपोटात वेदना आणि तीन वेळा उलट्या झाल्याची तक्रार करण्यास सुरुवात केली. परंतु डॉक्टर येण्याअगोदरच अलीचा मृत्यू झाला.

मुख्य वैद्यकीय अधिकारी ए.पी. भार्गव यांनी सांगितले की त्यांनी अलीचे नमुने घेतले आणि कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी त्यांना लखनौ येथील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हा अहवाल आल्यानंतरच अलीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *